Translate

रविवार, 30 अक्तूबर 2016

 🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃
 🍃💫🔯 दीपावलि 🔯 💫🍃
        लेखक - डाॅ.प.वि.वर्तक
                    भाग -1
   
दिवाळी हा शब्द मराठी आहे. दिव्यांची आळी म्हणजे दिवाळी. आळी म्हणजे रांग. घरांची रांग असते तिला 'आळी' असे मराठीमध्ये म्हणतात. पण आता हा शब्द आपण मूर्ख माणसांनी हरवून टाकलेला आहे. मराठी माणसेच आता आळीस 'लेन' हा इंग्रजी शब्द वापरतात. मानसिक पारतंत्र्य अजूनहि गेलेले नाही; उलट वाढतच चाललेले दिसत आहे. यास कारण आपलेच लेखक, दूरदर्शन नि वृत्तपत्रे आहेत. त्यांनी जर स्वातंत्र्यपूर्व काळातील स्वाभिमान जोपासला असता तर ही वेळ आली नसती. हे आपले जाता जाता निदर्शनास आणतो.
   दीपावलि हा संस्कृत शब्द दीप+आवलि मिळून बनलेला आहे. दीप म्हणजे दिवे. आवलि म्हणजे रांग. दिपांची रांग लावली जाते असा सण म्हणजे दीपावलि. दीपावलि हीच मराठीत दिवाळी बनली. दिवाळीत खूप व्यय होतो, त्यापायी जी अवस्था होते तीवरून 'दिवाळे निघणे' हा वाक्प्रचार आलेला असावा. दिवाळे निघण्याची पाळी येऊ नये म्हणूनच लक्ष्मीपूजन साजरे करण्याची प्रथा आली असावी. हे आपले माझे अनुमान आहे हो! त्यास पुरावा नाही.
   दिवाळी या सणास तरी पुरावा कुठे मिळतो? किती शतके दिवाळी चालू आहे हेहि सांगता येत नाही. कारण तशा नोंदी कुठे सांपडत नाहीत. त्यामुळे येथे आपण इतिहासातील पुरावे गोळा करीत अनुमान बांधू.
   दिवाळी ही सणांची आवलि म्हणजेच आळी आहे. लागोपाठ पांच-सहा दिवस हा सण चालतो. वसुबारस हा पहिला दिवस. धनत्रयोदशी हा दुसरा दिवस. दिवस म्हटले खरे, पण दिवसास महत्त्व नसून सायंकाळ महत्त्वाची असते. सायंकाळी दिवे रांगेमध्ये लावावयाचे असतात. नरकचतुर्दशी तिसरा दिवस, लक्ष्मीपूजन चौथा, पाडवा पांचवा तर भाऊबीज हा सहावा दिवस होय. सहा दिवस सण साजरा करणे ही जगातील एकमेव गोष्ट आहे. इतर कुठल्याहि धर्मामध्ये येवढा मोठा सण नाही. याचे कारण येवढा मोठा इतिहासहि इतर कुणा धर्माला नाही. हिंदु धर्माचा इतिहास पंचवीस सहस्र वर्षे इतका प्रचंड आहे. म्हणूनच प्रचंड मोठा सण आहे.
   हे सहा दिवस योजण्याचे कारण तैत्तिरीय संहितेमध्ये सांपडते. तैत्तिरीय संहिता म्हणजे कृष्ण यजुर्वेदाची तित्तिरी ऋषींनी सांभाळलेली संहिता होय. तैत्तिरीय संहिता  निदान दशसहस्र वर्षे इतकी मागे रचलेली आहे. हे मी म्हणतो कारण ती सांगते की कृत्तिका नक्षत्रावर उदगयनारंभ असतो. उदग् म्हणजे उत्तर दिशा. अयन म्हणजे उगवत्या सूर्याची चाल. उगविणारा सूर्य जेव्हा दक्षिणेकडून उत्तरेस वळतो तेव्हा उत्तरायणारंभ असतो. आज हा दिवस 22 डिसेंबरचा असतो. उत्तरायणारंभी तैत्तिरीयकाळी कृत्तिका नक्षत्रात सूर्य असे; पण आज सूर्य मूळ नक्षत्रात असतो. साहजिकच दहा नक्षत्रे सूर्य मागे हटलेला आहे. त्या हटण्याचे कारण परांचन किंवा संपात गति आहे. परांचन गतिमुळे सूर्य नउशे साठ वर्षामध्ये एक नक्षत्र मागे सरकत असतो. तेव्हा दहा नक्षत्रे मागे हटण्यास त्यास दशसहस्र वर्षे लागलेली असली पाहीजेत. साहजिकच तैत्तिरीय संहिता काळ दशसहस्र वर्षापूर्वीचा ठरतो.
 भेटूच भाग 2मध्ये.....

🌸 सर्वांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा🙏🏻🌸

कोई टिप्पणी नहीं: