Translate

मंगलवार, 5 मई 2009

संस्कृत खजिन्यांतील मोती - 4 आपण एकत्र आलो तर

आपण एकत्र आलो तर कांय ते चित्रफितीवर पहाण्याठी इथे क्लिक करा
मला एकेकाळी कविता पाठ करण्याची हौस होती कवितांमध्ये श्लोकांचाही समावेश होता.
कविता काय किंवा श्लोक काय, कधी ते आशयघन असतात तर कधी त्यांच्या शब्दातील नादमाधुरी आपल्याला भारुन टाकते.
असाच एक नादमधुर श्लोक माझ्या कायम स्मरणात आहे.
पयसा कमलं कमलेन पयः
पयसा कमलेन विभाति सरः।
मणिना वलयं वलयेन मणिः
मणिना वलयेन विभाति करः||
शशिना च निशा निशया च शशिः
शशिना निशया च विभाति नभः।
कविना च विभुः विभुना च कविः
कविना विभुना च विभाति नभः।।
शिकायला किती सोपा, कळायला किती सोपा आणि व्याकरणातील तृतियेचे प्रयोग शिकवायला तर अगदी आयडीयल श्लोक.
पयसा कमलं - पाण्यामुळे कमळ
कमलेन पयः - कमळामुळे पाणी
पायसा कमलेन विभाति सरः - पाणी आणि कमलामुळे सरोवर शोभायमान होतात.
तसेच मण्यामुळे कंकण व कंकणामुळे मणि शोभतात पण मणि आणि कंकण या दोघांमुळे हात शोभून दिसतो. मणिना वलयेन विभाति करः
तद्वतच चंद्रामुळे रात्र आणि रात्रीमुळे चंद्रमा शोभायमान होतात पण चंद्र आणि रात्र या दोघांमुळे आकाश शोभायमान होते
आणि कवि पुढे म्हणतो की, कविमुळे राजा व राजामुळे कवि पण कवि आणि राजा या दोघांमुळे सभा उठून दिसते.
शशिना च निशा, निशयाच शशिर्शशिना निशयाच विभाति नभः
कविना च विभुर्विभुना च कविर्कविना विभुना च विभाति सभा
या कवितेवरून आठवल. गणितात आपण म्हणतो एक आणि एक मिळून दोन होतात. पण समाजशास्त्र सांगते की एक आणि एक नेहमीच दोन नसतात. कधी कधी ते शून्य पण असतात. दोन वितंडवादी माणसं एकत्र आली तर सतत एकमेकांना खोडत रहाणार आणी फळ शून्य होणार. पण कधी कधी ते दोनही असतात. अगदी गणिताप्रमाणे. आणी कधी एक आणी एक अकरा पण होऊ शकतात. समाज एकत्रपणा वागला, एकसंघ होऊन चालला, तर केलेल्या चांगल्या कामाचे अकरापट फळ मिळू शकते.
----------------------------------------------------------------