Translate

गुरुवार, 30 अप्रैल 2009

संस्कृत खजिन्यांतील मोती - 3 : सत्वाने कार्यसिद्धी

संस्कृत खजिन्यांतील मोती - 3 : सत्वाने कार्यसिद्धी चित्रफितीवर पहाण्याठी इथे क्लिक करा
आज आविष्कारांचे युग आहे आणि मनुष्याला पुढे नेण्यासाठी कित्येक साधन सुविधा उपलब्ध आहेत. एकीकडे अशा साधनांचे पेव फुटले आहे. संगणक आला, मोबाईल आला, इंटरनेट आले. घरगुती वॉशिंग मशीन पासून तर एस्कलेटर पर्यंत अशा कित्येक ऑटोमॅटिक सुविधा आल्या. पण या मशीनी सुविधांच्या जगांत मनुष्य हरवला तर त्याचे मोटिवेशन कसे टिकवायचे हा प्रश्न मॅनेजमेंटच्या संस्थामध्ये प्रामुख्याने घेतला जात आहे.
या सगळयावरुन मला एक श्लोक आठवतो. अगदी लहानपणापासून माझा आवडता हा श्लोक आहे.
रथस्थैकं चक्र, भुजगयमिता: सप्त तुरग:
हे सूर्याचे वर्णन मांडलेलं आहे त्याच्या रथाला एकच चाक आहे. त्याचे सप्त तुरग: म्हणजे सात घोडे आहेत पण त्यांचे पाय भुजगांनी - सापांनी बांधलेले आहेत.
निरालम्बो मार्ग : चरणविकल: सारथिरपि
त्याचा रस्ता निरांलब आहे - म्हणजे वाटेत कुठेही आलंबनासाठी म्हणजे विसावा अथवा आधार घेण्यासाठी जागा नाहीये. त्याच्या सारथी अरुण हा चरणविकल म्हणजे पायांनी अधू आहे. आणि तरीही
रविर्यात्येवान्तं प्रतिदिनमपारस्य नभस:
हा रवि, हा यूर्य दररोज अपार अशा नभाची यात्रा पूर्ण करतो.
यासवरुन आपण बोध घ्यावा की,
क्रियासिध्दि: सत्वे भवति पुरुषां नोपकरणे
माणसाला जी क्रियासिध्दि होते, त्याचं काम पूर्ण होत ते उपकरणांमुळे नाही, तर त्याच्या अंतर्मनातील सत्वामुळे. त्याची जिद्द, चिकाटी या गुणांमुळे कार्य यशस्वी होत- तेच नसेल तर सगळया प्रकारची उपकरणं, साधनं असून काय उपयोग
पुन्हा बघूया हा श्लोक
रथस्यैकं चक्रं भुजगयमिता: सप्त तुरग:
निरालम्बो मार्गश्चरणविकल: सारथिरपि
रविर्यात्येवान्तं प्रतिदिनमपासस्य नभस:
क्रियासिध्दि: सत्वे भवति पुरुषां नोपकरणे ॥

म्हणूनच आपण म्हणतो मन घडवा माणूस घडवा. मनामध्ये जिद्द असू द्या. सत्व असू द्या. मी कार्यसिध्दिला नेणारच असा ठाम निश्चय असून द्या. मग साधनांची कमतरता तुमच्या आड येणार नाही - तुमचे सत्वच तुम्हाला तुमचे ध्येय मिळवून देईल.
मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी मनात खोल उतरवून ठेवण्यासारखा श्लोक आहे हा !
-------------------------------------------------------------

कोई टिप्पणी नहीं: