Translate

सोमवार, 20 फ़रवरी 2017

मराठी शाळेत मराठी टंकलेखन प्रशिक्षणाचा उपक्रम

अहवाल (रिपोर्ट)
कौशलम् न्यास व रोटरी क्लब मगरपट्टासिटी हडपसर पुणे यांमार्फत मराठी शाळेत मराठी टंकलेखन प्रशिक्षणाचा उपक्रम
दिनांकः १४/११/२०१५ ते २२/११/२०१५.
पूर्वचर्चा-
श्रीमती. लीना मेहेंदळे (कौशलम् न्यासच्या मुख्य संरक्षक) व श्रीमती. पद्मजा शास्त्री (मेंबर रोटरी क्लब, मगरपट्टासिटी हडपसर) यांच्या पूर्व परिचयाने त्यांच्या रोटरी क्लब कडे असलेल्या पुरोगामी माध्यमिक विद्यालयातील ७ वी ते १० वी वर्गातील विध्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्टीमध्ये संगणकावर मराठी टंकलेखन शिकवण्याबाबत चर्चा झाली.
सदर बाबत दिनांक २१/१०/२०१५ रोजी कौशलम् ट्रस्ट यांचेकडून पद्मजा शास्त्री व रोटरी क्लब मगरपट्टासिटी, हडपसर पुणे चे एज्युकेशन डायरेक्टर श्री. सुर्यकांत चौधरी यांना इमेल द्वारे प्रशिक्षणाबाबतची माहीती देण्यात आली. त्यानंतर दिवाळी सुट्टीमधील तारखा दिनांक १४/११/२०१५ ते २२/११/२०१५ व प्रशिक्षण हे दोन बॅचेस
मध्ये ठरविण्यात आले. मुख्याध्यापक पवार सर यांच्या मान्यतेवरून वेळ १०-०० ते ११-३० मुलींसाठी व ११-३० ते ०१-०० मुलांसाठी ठरविण्यात आली.
शाळेचे योगदान -
या प्रशिक्षणासाठी पुरोगामी माध्यमिक विद्यालयाने दोन संगणक कक्ष उपलब्ध करून
दिले ज्यामध्ये एकूण ३० संगणक उपलब्ध होते.
उपलब्ध विद्यार्थी मुले व मुली बॅच नुसारः
बॅच १ - मुली संख्या ६२ वेळ १०-०० ते ११-३०
बॅच २ - मुले संख्या ४५ वेळ ११-३० ते ०१-००
दिवस १ ते ९ दिनांक १४/११/२०१५ ते २२/११/२०१५
प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा रिपोर्ट-
पहिल्या दिवशी दोन्ही ही बॅचेसला सर्वप्रथम इन्स्क्रिप्ट ही संगणक प्रणाली कशी सुरू करतात व
त्यामध्ये भाषा मराठी निवडून माक्रोसॉफ्टच्या विन्डोज सेव्हन ऑपरेटींग सिस्टीम मध्ये  ती उपयोगात
कशी आणतात हे शिकवले.

Start ---> Control Panel ---> Regional and Language option ---> Regional
option Tab Select Language 'Marathi(India)' ---> Click Apply

त्यानंतर टास्कबार वर एक लँगवेज बार तयार होतो. व त्यामधून मराठी भाषा
निवडून टंकलेखन करावयास शिकवले. सुरुवातीपासूनच आठही बोटे वापरून टंकन करण्याबाबत
कटाक्ष ठेवण्यांत आला.  त्यामध्ये सुरूवातीला अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ,
अं, अः ही अक्षरे पहील्या दिवशी शिकवली व त्यासाठी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद चांगला मिळाल्याने
मग दुस-या दिवशी क, ख, ग, घ शिकवले व त्यावरून विद्यार्थ्यांकडून प्रत्येक अक्षरावरील बाराखडी
शिकवली. त्यानंतर च, छ, ज, झ पासून ते क्ष, ज्ञ पर्यंत अक्षरे व त्यावरील बाराखडी पूर्ण केली
व वारंवार सराव करून घेतला. त्यामुळे त्यांना अक्षर ओळख व शब्दांना काना, मात्रा, वेलांटी, उकार
यांसारख्या गोष्टीचा ही चांगला सराव होतो. त्याबाबतीत ही सर्व विद्यार्थ्यांनी काना, मात्रा, वेलांटी,
उकार चांगल्या प्रकारे समजाउन घेतले. बाराखडीचा चांगला सराव झाला आहे हे लक्षात आल्यानंतर
त्याच्या दुस-या दिवशी शब्द-जोडशब्द शिकवून त्याचा ही चांगला सराव करवून घेतला. त्यानंतर
विद्यार्थ्यांना काही परिश्चेद टाईप करण्यासाठी दिले ते ही त्यांना व्यवस्थीत आठही बोटांचा वापर
करून टाईप केले. व शेवटच्या दिवशी 'मराठी टायपिंगचा क्लास कसा वाटला' या बाबत प्रतिक्रिया
म्हणून विद्यार्थ्यांना ८-१० ओळी निबंध लिहुन आणन्यास सांगितला होता. व तो स्वतः विद्यार्थ्यांनी
लिहीलेले निबंध विद्यार्थ्यांनी टाईप करून संपूर्ण इन्स्क्रिप्ट मराठी टंकलेखन ९ दिवस केलेल्या
प्रशिक्षणाची सांगता झाली.
कौशलम् न्यास व रोटरी क्लब हडपसर यांचे योगदान-
सदरहू इन्स्क्रिप्ट मराठी टंकलेखन शिकवू शकणारे दोन प्रशिक्षक कौशलम् न्यासाने उपलब्ध
करावे व त्यांचे मानधन रोटरी क्लबने परस्पर त्यांनाच द्यावे असे ठरले होते त्याप्रमाणे 'कौशलम् न्यासाने
श्री योगश जांभळे व कु. प्राजक्ता जांभळे यांची योजना केली. त्या दोघांनी 'रोटरी क्लब मगरपट्टा सिटी हडपसर पुणे'
यांच्या उपक्रमाअंतर्गत पुरोगामी माध्यमिक विद्यालयातील मुली-मुलांना शिकवून हे कार्य पूर्ण केले व
त्याबद्दलचे मानधन हे 'रोटरी क्लब मगरपट्टा सिटी हडपसर पुणे' यांच्या एज्युकेशन डायरेक्टरांकडून कौशलम् न्यास च्या परस्पर रू. ७०००/- रोख देण्यात आले, प्रत्येकी ३०००/- अधिक प्रवासभत्ता ५००/- असे.
इन्स्क्रिप्ट मराठी टंकलेखनाचा सोपेपणा -
हे मराठी टंकलेखन अतिशय सोप्या पद्धतीचे आहे. त्यामध्ये मराठी वर्णमालेनुसार की-बोर्डाची मांडणी
केली आहे. त्यामुळे कि-बोर्डवरील मराठी अक्षरांचे अनुक्रम लक्षात ठेवण्याची कटकट संपते व अतिशय सोप्या पध्दतीने कमी शिक्षण झालेल्या लोकांना इंग्रजी न शिकता ही मराठी टायपिंग अवगत करता येते.
या मराठी टंकलेखनाचे वैशिष्ठ्य म्हणजे डाव्या बाजूला स्वर, काना, मात्रा तर उजव्या बाजूला सर्व व्यंजने आहेत. त्यामुळे एकाआड एक दोन्हीं हातांनी टंकन केले जाऊन टंकलेखनाचा वेग वाढण्यास मदत होते.
इन्स्क्रिप्ट पद्धतीने केलेले मराठी टंकलेखन इंटरनेटवर टिकून राहते तसेच ते एडीटेबल (Editable) फॉर्म मध्ये जसेच्या तसे उपलब्ध असते. त्याला इंटंरनेटवर टाकण्यासाठी पीडीफ फाइल करावी लागत नाही.
इन्स्क्रिप्ट मराठी टंकलेखनाचे थोडक्यात फायदे-
विद्यार्थ्यांनी पहीली इयत्तेत प्रवेश घेतल्यानंतर पुढे शिकत असताना इयत्ता आठवी पर्यंत शिकत येईतोपर्यंत 70 टक्के विद्यार्थी संख्या कमी होऊन जाते, असे संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा सर्वे आहे. अशा गळालेल्या मुलीमुलांना इंग्रजीचा नेहमीच बाऊ वाटतो. त्यामुळे शिक्षणापासुन वंचित असलेल्या या मुलांना इंग्रजी शिकवणे व पारंगत बनवणे तितके सोपे नाही. संगणकीय कि-बोर्ड हा रोमन मध्ये जरी असला तरी रोमनच्या आधारे मराठी स्पेलिंग करणे या मुलांना कठिणच असते.  त्यामुळे शिक्षणापासून वंचित मुले संगणकापासून वंचितच रहातील असा त्यांचा व आपलादेखील समज असतो. परंतू मराठी वर्णमाला, तसेच मराठी भाषा त्यांना अवगत असते.  अशा  मराठी येणा-या प्रत्येक व्यक्तीला आपण संगणकावर इन्स्क्रिप्ट पध्दतीने मराठी टंकन शिकवू शकतो. त्यांनी ते शिकल्यानंतर सरावाने ते संगणकावर मराठीमध्ये वेगाने टंकन करु शकतात व याचा वापर करून ते नोकरी देखील मिळवू शकतात.
पंतप्रधानाच्या 'डिजिटल भारत' या संकल्पनेत संगणकीय ज्ञान व त्याआधारे इंटरनेटचा सुगमतेने वापर अभिप्रेत आहे. ते म्हणतात, 'डिजिटल भारत' या योजनेत प्रत्येक भारतीयाला संगणक हा हाताळता यायला हवा.
  याचसाठी इंग्रजी टंकलेखन शिकवण्याच्या मर्यादा विचारात घेऊन इन्स्क्रिप्ट पद्धतीने मराठी टंकन शिकवल्यास एरवी शिक्षणात फारशी प्रगति न करू शकणारी मुलीमुलेदेखील संगणक साक्षर होतात व त्यांना इंटरनेटवरील मराठीतून उपलब्ध असलेला समग्र ज्ञानसाठा तसेच शासनाने ऑनलाइन पुरवलेल्या सर्व सोई उपलब्ध राहू शकतात. याप्रमाणे संगणकावर मराठी टंकशिक्षणाचा उपयोग रोजगार, ज्ञानवृद्धि तसेच शासकीय योजनांचा लाभ अशा तीनही प्रकारे होऊ शकतो.
सांगता-
मराठी टंकलेखनाचे हे प्रशिक्षण  पुरोगामी माध्यमिक विद्यालयातील १०७ विद्यार्थ्यांनी पूर्ण केले व शेवटच्या दिवशी या प्रशिक्षणाच्या समारोपाच्यावेळी रोटरी क्लबच्या सदस्य तसेचं रोटरी क्लबच्या डायरेक्टरांनी ही सर्व विद्यार्थ्यांना आठही बोटांनी परिच्छेद टंकन करताना पाहीले तेव्हा त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतिबाबत समाधान व्यक्त केले व रोटरी क्लब तर्फे त्यांच्याकडे दिलेल्या बाकी शाळांमध्येही अशा प्रकारच्या पशिक्षणाबाबत पुढे नियोजन करण्याचे ठरले.
----------------------------------------------------------