श्रीपाद अभ्यंकर sanskrit2601@gmail.com लिहीतात --
विचार असा मनात येतोय की, माणूस संस्कृत-पंडित होतो म्हणजे त्याचं संस्कृतचं ज्ञान सर्वसमावेशक होतं कां ? आपण इंग्रजी-पंडित म्हणतो कां, हिंदी-पंडित म्हणतो कां ? जर तसं म्हणत नाही, तर संस्कृत-पंडित कशाला म्हणायचं ?
सर्वसमावेशक ज्ञान अशा दृष्टीनं विचार करताना असं लक्षात येतं की, जगातल्या कुठल्याही विषयातील माहिती संस्कृतमधून व संस्कृतमध्ये उपलब्ध व्हावी हें काम संस्कृत-पंडिताला करता आलं पाहिजे. आज इंग्रजीत जगातल्या कुठल्याही विषयातील माहिती उपलब्ध होते.
संस्कृत भाषा ही समर्थ भाषा आहे, असं जर म्हणायचं, तर भाषेच्या समर्थतेचा एक निकष सर्वसमावेशक ज्ञानाची उपलब्धता हा देखील असतो. संस्कृतभाषा अशी समर्थ असायची तर तीत सर्वसमावेशक ज्ञान उपलब्ध असायला हवं. संस्कृत पंडिताला कसे करून देता यायला हवे. थोडक्यांत, पांडित्य हे भाषेनुसार असण्यापेक्षा विषयानुसार असतं, किंबहुना तें तसंच असायला हवं. काळाचीही तीच गरज आहे.
गेल्या वर्षी इथे गोरेगांवात श्री. धनंजय देशपांडे, निवृत्त न्यायाधीश, मुंबई यांचं "वेदांतील विज्ञान" अशा विषयावर भाषण झालं होतं. तशी त्यांची पुस्तके देखील आहेत, मराठीत आणि इंग्रजीत. वेदांचा हा असा अभ्यास हा एकदम काळाशी सुसंगत आहे.
हा सर्व विचार मनात आल्यावर थोडीफार कल्पनाही मनात रुजतेय कीं संस्कृतमध्ये मला इथून पुढे काम करताना कोणत्या दिशेने काम करतां येईल.
------------------------------------------------------
माझे उत्तर -- इंग्रजी शिक्षण पद्धतीमधे आपण ते तसं म्हणायला शिकतो -- इंग्लिश घेऊन किंवा हिंदी घेऊन एम ए झालेले आपण पहातोच ना -- भाषेवर प्रभुत्व (हे वर्णन तरी किती योग्य ?) या अर्थाने संस्कृत पंडित हा शब्द वापरला जाऊ शकतो, पण तुमचा मुद्दा बव्हंशी योग्य आहे.
संस्कृत भाषेतून आतापर्यंत केलेल्या ग्रंथरचनांमधे विभिन्न विषयांचे ज्ञान तसे खूप आहे पण भाषाविदांच्या आणि त्या त्या विषयांच्या पंडितांच्या अभावामुळे पकडीत येत नाही. ते आणता यावे याबाबत हेतुपूर्वक प्रयत्नांची गरज आहे उदा चाणक्याचे अर्थशास्त्र समजायचे असेल तर अशी व्यक्ति हवी जिने संस्कृतसोबत अर्थशास्त्राचाही गाढा अभ्यास केलेला आहे. ही एक मोठी कमतरता आपल्या शिक्षणांत आहे.
तिसरा मुद्दा -- भाषा समर्थ रहाण्यासाठी फक्त पूर्वसंचित पुरेसे नाही तर नवी ग्रंथरचनाही होणे आवश्यक. ते आज संस्कृत तर सोडाच पण बोलचालीतील भारतीय भाषांमधे सुद्धा अभावानेच होत आहे. -- हा तर खूप गंभीर प्रश्न आहे त्या सर्वांच्याच अस्तित्वाबद्दल.
असो - मी मराठीतून संगणकाची जादुई दुनिया असे शास्त्रीय पुस्तक लिहिले आहे. तुम्हाला पटल्यास त्याच्या संस्कृत संस्करणाचा प्रयत्न करता येईल.
--------------------------------------------------------------