Translate

गुरुवार, 12 मार्च 2009

संस्कृत खजिन्यांतील मोती -2 : गुरु महिमा

भाग 2 गुरुमहिमा
भारतीय संस्कृतीत गुरु या व्यक्तीला अनन्य साधारण महत्व आहे. मातृ देवो भव, पितृ देव भव, आचार्य देवो भव असं एकाच वेळी मांडलं गेलं आहे. जन्मदात्या आई-वडिलांचा मान देवाइतका. तसेच आचार्यांचा मानही देवाइतका.
आपल्या सर्वांच्या नित्य ऐकण्यातला छान श्लोक आहे.
गुरुर्ब्रह्मा, गुरुर्विष्णुः
गुरुर्देवो महेश्वर: |
गुरुः साक्षात परब्रह्म
तस्मै श्री गुरवे नम: ||
गुरुर्ब्रह्मा - गुरु हाच ब्रह्मदेव आहे, गुरुर्विष्णु: - गुरु हाच विष्णु आहे, गुरुर्देवो महेश्वरः - गुरु हाच देवाधिदेव महादेव पण आहे. गुरु हाच साक्षात्‌ परब्रह्म देखील आहे. तस्मै श्री गुरुवे नमः - म्हणून अशा या श्री गुरुला माझे नमन असो.
गुरुलाच साक्षात देवाच्याही आधी वंदन असो असे सांगणारे आले भक्त शिरोमणि कबीर होऊन गेले - ते म्हणतात
“गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाय|”- गुरु आणि गोविंद असे दोघेही माझ्यासमोर उभे ठाकलेत, तर मी आधी कुणाच्या पाया पडू? आणि उत्तर सांगतात “बलिहारी गुरु आपनी - जिन्ह गोविंद दिया बताय||”
हे गुरुवर्या आधी तुमच्याच पाया पडणार, कारण तुमच्यामुळेच मला गोविंद समजला - परमात्म्याचं स्वरुप समजल.
एक फार जुनी बंदिश आहे - गुरु बिन कैसे गुण गाऊँ, गुरुने शिकवले नाही - ज्ञान दिले नाही तर मी परमेश्वराचे गुण वर्णन तरी कसे करु?
ज्ञानदेव म्हणतात --
हे अपार कैसेनी कवळावे
महातेज कवणे धवळावे
गगन मुठी सुवावे
मशकें केवी ?
परी एथ असे एकु आधारु
तेणेची बोले मी सधरु
जे सानुकूळ श्रीगुरु
ज्ञानदेवो म्हणे
हे गीतेचे अपार तत्वज्ञान म्हणजे सूर्याला उजाळा देण्यासारखे किंवा चिलटाने आकाशा मुठीत धरण्यासारखे आहे- तरी पण मला आधार आहे तो अनुकूल असलेल्या श्री गुरु निवृत्तीनाथांचा, म्हणूनच मी हे करु शकेन.
थोडक्यात सांगायचे तर ज्ञानाच्या कक्षा, त्याच बरोबर कर्तृत्वाच्या कक्षा उंचावण्यासाठी आपल्याला गुरुच पुढे घेऊन जातो.
गुरु महिमा अगाध आहे. तसेच भारताची गुरु व गुरु-कुलांची परंपराही फार मोठी आहे. म्हणूनच गुरु: साक्षात परब्रह्म सारख्या ओळी कविला अनायास सुचतात आणि ऐकण्या-यालाही लगेच भावतात.
------------------------------------------
आकाशवाणी जळगांवच्या प्रकाशकिरण या कार्यक्रमातून केलेले विवेचन, रविवार, दि. ---??
संस्कृत खजिन्यांतील मोती -2 : गुरु महिमा ही चित्रफीत पहाण्यासाठी क्लिक करा

कोई टिप्पणी नहीं: